नातेसंबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नातेसंबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

मुलांना आजी आजोबा हवेत

मुलांना आजी आजोबा हवेत

 

grandfather. grandmother. grandparents. grandschildrens. आजी . आजोबा . आजी-आजोबा. नातवंडे.


मानवी भाव-भावनांच्या भक्कम पायावर उभे असलेले व तेव्हढेच प्रेमळ तसेच मायाळू असलेले नाते म्हणजे आजी-आजोबा आणि नातवंडातील शब्दापलीकडील नाते.  कोणत्याही नात्याला हेवा वाटेल असे हे आजी-आजोबा व नातवंडे यांचे नाते.   या नात्याला दुधावरच्या सायीची उपमा दिल्यामुळे या नात्यातील गहिरेपणा अधिकच प्रकर्षाने जाणवितो.   या नात्याकडे सहज, सुंदर व संपन्न नाते तसेच निर्व्याज प्रेमळ नाते म्हणून पाहिले जाते.   हे एक आपुलकीचेजिव्हाळ्याचे नाते आहे.   मुलगा किंवा मुलगी कितीही प्रेमाची तशीच मायेची असतील तरी त्यांच्या मुलांवरचे प्रेम नेहमीच दोन अंगुळे जास्त असतेच व  म्हणूनच ते शब्दांत कधीच व्यक्त करता येणार नाही.  आजी-आजोबांच्या मनातील एक कप्पा हा नेहमीच नातवंडानी व्यापलेला असतो.  नातवंडांच्या नुसत्या आठवणीने आजी-आजोबा हळवे होतात.  एकदा नातवंडे झाली की आजी-आजोबा यांचा मुलां-मुलींपेक्षा नातवंडांकडे ओढा जास्त असतो.  नातवंडे प्रेमाने कुशीत शिरली की ते जे समाधान आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर दिसते त्याचे वर्णनच करूच शकत नाही.  या नात्याला लडिवाळ नाते म्हटले तर जास्त संयुक्तिक ठरेल.  आपल्या नातवंडांच्या रूपात ते आपल्या मुलींचे / मुलांचे बालपण तसेच त्यांची मोठे होण्याची प्रक्रिया या गोष्टींचा ते पुन्हा एकदा अनुभव घेत असतात.  काबाडकष्ट करून वाढवलेल्या वृक्षावर येणारी नातवंडरूपातील  फळे पहाण्यास तसेच त्यांना स्पर्श करण्यास आजी-आजोबा आसुसलेले असतात.  आजी-आजोबा लवकर इकडे या असे अधिकारवाणीने सांगणारी नातवंडे असतात.  सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की हे ऐकल्यावर आजी-आजोबा धावत पळत येतात.   तसेच तुम्हाला काहीच कसे कळत नाही हे सांगणारी सुद्धा नातवंडे असतात व त्यात आजी-आजोबांना काहीच वाटत नाही व ते हसण्यावारी नेतात. 

 

एक कबूल करावेच लागेल की मुलांना आजी-आजोबा हवेतच.  नातवंडांनाही ते शिक्षित आहेत का अशिक्षित याचा काही फरक पडत नाही.  नकळतपणे नातवंडेही एक मानसिक आधार म्हणून आजी-आजोबांकडे पहात असतात.  आई-वडिलांपेक्षा मुले आजी-आजोबांकडे नकळतपणे ओढली जातात.  मुलांना आई-वडिलांकडून प्रेम तर मिळतच असते पण आजी-आजोबांचे प्रेम ही एक वेगळीच गोष्ट आहे.   आजी-आजोबांनाही एक प्रकारची अशब्द आपुलकी असते.   कधी कधी घरात चेष्टा मस्करीत थोडे मतभेद झाले तर आई-बाबा एकाबाजूला व आजी-आजोबांबरोबर नातवंडे असा विरुद्ध पक्ष तयार होतो.  आई-बाबा रागावले की मुले आजीच्या पदराआड लपतात.  आजी त्या मुलांना दोन गोष्टी समजावून सांगते.  आई का रागावली हे नातवंडांकडून ऐकून घेतांना तुझे कुठे चुकले हेही गोडी-गुलाबीने समजावून सांगते.  अशा वेळेस नातवंडांना आजीचा आधार फार भक्कम वाटतो.  आजी-आजोबांच्या मनात नातवंडांसाठी हळवा कोपरा तर असतोच पण प्रसंगी कठोर होऊन नातवंडांना त्यांची चूकही दाखवून देतात व पुन्हा अशी चूक होणार नाही याची ग्वाहीही नातवंडांकडून घेतात.  आजी-आजोबांच्या भूमिकेत शिरले की नकळतच नातवंडांसाठी मनातील एक भाग राखून ठेवला जातो.  मुलांचे आजी-आजोबांबरोबरचे नाते नैसर्गिकरित्या उमलत जाते.  आजी-आजोबांमुळे भाषेची ओळख होणे खूप सोपे जाते.  आजीला खूप ओव्या, अभंग, श्लोक, वेचे इत्यादी तोंडपाठ असतात व नातवंडांना समोर बसवून आजी आपल्या आवाजात म्हणून दाखवत असते.   कालांतराने ऐकून ऐकून नातवंड नकळतपणे आजीबरोबर  म्हणू लागतात.   त्यातील एखादा शब्द अडला तर आजी न रागावता नातवंडांना समजावून सांगते. त्यामुळे नवीन नवीन शब्द कानावर पडल्यामुळे साहजिकच शब्दसंग्रह वाढतो.  आजी जेव्हा काही समजावून सांगत असते तेव्हा त्या शब्दांचा अचूक उच्चारही आजीच्या तोंडून कानावर पडतो त्यामुळे वेगवेगळ्या शब्दांचा तंतोतंत उच्चार कसा करायचा याचे धडे नकळत आजी नातवंडांना देत असते.  या  आपोआप घोकलेल्या उच्चारांमुळे  पुढील आयुष्यात त्या उच्चारांचा फायदाच होतो.  एका बाजूला आजी निरनिराळ्या ओव्या, अभंग, श्लोक, वेचे इत्यादी या योगे नातवंडांना शब्दांची ओळख, शब्दसंग्रह तसेच अचूक उच्चार याचे नकळत धडे देत असते.  त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आजोबा निरनिराळ्या गोष्टी सांगून नातवंडांचे मन तर रिझवीत असतातच पण त्याचबरोबर त्यांच्या सामान्य ज्ञानात भरही टाकीत असतात.   त्यात गोष्टीरूप रामायण, महाभारतातील कथा असतातपंचतंत्रातील कथा असतातव्यवहारी जगातील काल्पनिक कथा असतात, बालकथाही असतात अशा कित्येक प्रकारच्या कथांचा खजिना आजोबा आपल्या नातवंडांसमोर रिता करीत असतात.  कधी कधी त्यात परीकथाही असतात.  जसजसे वय वाढते तसे परीकथांचे प्रमाण कमी होत जाते.  आजी-आजोबांच्या कृतीतून नातवंडांना फायदाच होत असतो.  सामान्य ज्ञानात भर तर पडतेच पण त्याचबरोबर शब्दोच्चार अचूक या अस्खलित करण्यासाठी प्रयत्न करण्याची सवय लागते.   तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टींमुळे  संस्कार विकसित होण्यास मदत होते.  हा जन्मभरीचा ठेवा नातवंडांना आजी-आजोबांकडूनच मिळतो.  पतंग उडविताना फिरकी धरायला आजोबाच लागतात तसेच पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात होड्या सोडण्यासाठी होड्या बनवून द्यायला आजोबाच लागतात. तसेच शाळा शाळा खेळतांना आजी-आजोबाच विद्यार्थी म्हणून लागतात.  शाळा शाळा खेळतांना नातवंडांच्या हातून फूटपट्टीचा हलकासा मार खावा लागतो पण आजी-आजोबा ते आनंदाने सहन करतात.  नातवंडांना आजी-आजोबा इतके जवळचे वाटतात की मनातील काही गुपिते ते त्यांच्यासमोर उघड करण्यात तत्पर असतात.   आपल्याला आपले आजी-आजोबा नक्कीच मदत करतील याची त्यांना खात्री असते.  वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर काही गोष्टी आई-वडिलांना सरळ सांगणे त्यांना कठीण जात असते अथवा त्यांची मानसिक तयारी होत नसते अशावेळेस ते प्रथम आजी-आजोबांना त्या गोष्टी सांगतात.  त्यांना खात्री असते की अचूक मार्गदर्शन अथवा अचूक सल्ला मिळण्याची जागा म्हणजे आजी-आजोबा.  त्यांना ही खात्री असते की आपण जर बरोबर असलो तर नक्कीच आजी-आजोबा आई-बाबांबरोबर त्या विषयी बोलतील.  नातवंडांचे जर बरोबर असेल तर आपल्या जीवनातील अनुभवाच्या  आधारे ते आई-वडिलांना समजविण्याचा प्रयत्न करतील, त्यांना मार्गदर्शन करतील असा विश्वास नातवंडांना असतो.  आपल्या मुलांना आलेल्या समस्या, आलेले प्रश्न आपल्या नातवंडांच्या वाट्याला येऊ नयेत याबद्दल ते सजग असतात.  आपल्या मुलाला जे मिळाले नाही अथवा आपण देऊ शकलो नाही त्या गोष्टी नातवंडांना मिळाव्यात याबद्दल ते प्रयत्नशील असतात.  

 

एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजी-आजोबांची भूमिका म्हणजे सोपी गोष्ट नसावी.  मुलांना वाढवतांना त्यांनी कडक शिस्तीचे धडे दिलेले असतात.  त्यांचे लाड करतांना त्याचे फाजील लाड होणार नाहीत याची काळजी घेतलेली असते.  मुले बिघडू नयेत म्हणून व्यवस्थित वळण लावलेले असते.  त्यांच्या शिक्षणाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले जाते.  त्यांच्या वागण्यावर बारकाईने लक्ष दिले होते.  कालांतराने ते आजी-आजोबांच्या भूमिकेत शिरतात.  नातवंडांचे आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतील तर त्यांची वेगळी भूमिका असते.  दोघेही नोकरीसाठी बाहेर पडल्यावर नातवंडांचे संगोपन ही त्याची प्रमुख तसेच महत्त्वाची भूमिका ठरते.  त्याचे लाड करतांना ते अवाजवी होणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे असते.  नातवंडे ही तिसरी पिढी असल्यामुळे साहजिकच विचारसरणीतही फरक पडू शकते.  तसेच दिनचर्येतही काळाप्रमाणे बदल झालेला असतो व तो बदल अंगीकारणे आजी-आजोबांना जाड जाते. शिक्षण पद्धतीत बदल झालेला असतो. या परिस्थितीला देणे हे आजी-आजोबांना नक्कीच जड जात असेल.  शिक्षणपद्धतीतही आमूलाग्र बदल झालेला असल्यामुळे त्या पद्धतीशी जुळवून घेणे नक्कीच कठीण जात असेल.  त्याचबरोबर आजी-आजोबांचा असाही विचार असू शकतो की नोकरी तसेच इतर काही कारणांमुळे आम्हाला मुलांना वाढतांना मनसोक्त पहाता आले नाही अथवा मुलांना  वाढवताना आमच्या हातून काही चुका झाल्या असतील हा विचार करून नातवंडांच्या सर्वंकष प्रगतीकरिता मनापासून प्रयत्न केले जातात.  त्यांना वाढतांना पाहून एक वेगळाच आनंद आजी-आजोबांना मिळत असतो व त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधण्याची सवयच लागते.  नातवंडांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आई-बाबा जरी नोकरीसाठी बाहेर पडत असले तरी आजी-आजोबा जवळ असल्यामुळे एकटेपणा जाणवत नाही.   तसेच कुटुंब संस्कारांची ओळख तर होतेच पण त्याचबरोबर इतर नातेवाईकांशी संपर्कही साधला जातो.  आजी-आजोबांशी गप्पा मारतांना नातवंडांना आपल्या कुटुंब पद्धतीची तसेच कौटुंबिक नातलगांशी माहिती करून घेता येते.  त्यांना असे वाटत असावे की आई-बाबांपेक्षा आजी-आजोबा आपले म्हणणे / समस्या शांतपणे ऐकून घेतात त्यामुळे साहजिकच आजी-आजोबांकडे त्या मुलांचा ओढा वाढतो.   पण हे ही विचार करण्यासारखे आहे की नोकरी करणाऱ्या आई-बाबांना घराबरोबरच बाहेरील / कार्यालयातील ताण-तणावांनाही तोंड द्यायचे असते. 

 

शेवटी असे म्हणता येईल की आजी-आजोबा यांच्या खेळकर नात्यामुळे घरातील वातावरण हलके फुलके राहण्यास मदत होते.  या नात्याचे वर्णन इंग्रजीत करतांना 'ग्रँड' हा समर्पक व रुबाबदार उपसर्ग जोडला जातो. ग्रँडफादर / ग्रॅण्डमदर हे शब्द नेहमीच आदराने घेतले जातात . 

 

 



सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

नात्यांची गरज “संवाद”

 

नात्यांची गरज “संवाद”

जशा प्रेमाच्या व्याख्या व्यक्तीशः बदलतात तसेच नात्यांच्याही बाबतीत आहे. दोन व्यक्तींमधील बंध मग तो कोणताही असुदे प्रियकरांमधील प्रेमाचा, आईवरील प्रेमाचा, आजी आजोबा, बहिण-भाऊ, भाऊ-बाबा किंवा अगदी निखळ मैत्रीचाच बंध, हे बंध म्हणजे मला वाटतं देवानं निर्माण केलेली नाती आणि त्यातला जिव्हाळाच.

natyachi garj. nate kase tikavave. नात्याची गरज . नाते कसे टिकवावे?  संवाद . नातेसंबंध.  प्रेम. communication. love.

या वेगवेगळ्या नात्यांमुळेच खरं म्हणजे आयुष्याला उभारी येते. माणूस पूर्णत्वाकडे जातो आणि समृद्ध होतो. जर उदाहरण सांगायचं झालं तर माझच सांगेन. बहिण हे नातं इतक सुंदर आहे की त्याची तुलना इतर  कुठल्याही नात्याशी होऊ शकत नाही. मला सख्या बहिणी नाहीत परंतु मला माझ्या चारही आते बहिनी सख्या नाहीत असे कधी वाटतच नाही. मी सगळ्यात लहान म्हणजे शेंडफळ, आणि ह्या माझ्या आतेबहिनी, आम्ही एकत्र राहतही नाही पण तरीही आमचे नाते अतूट आहे कारण आमच्या नात्यातील दुवा आहे संवाद .

किती अन काय काय करू शकतो हा संवाद?

दुरावलेली, विखुरलेली, अस्पष्ठ, अबोल नाती आणि अनोळखीही फक्त एका संवादामुळे अखंडपणे जोडली जाऊ शकतात. चार आपुलकीचे, मायेचे आणि काळजीचे शब्द नात्याचा अतूट बंध निर्माण करतात. नाती जपली पाहिजेत, टिकवली पाहिजेत अस फक्त म्हणत बसून नाती टिकत अगर जपली जात नाहीत. त्यासाठी आपला स्वतःचा ५ मीनीट वेळ सुद्धा खूप काही करू शकतो. हा ५ मिनिटांचा संवाद आपल नातं आयुष्यभर तारू शकतो.

एका संवादामुळे माणसाचा मूड कळू शकतो, संवाद हि शब्दांची देवाण घेवाण नसून ती भावनांची देवाण घेवाण आहे. त्यामुळे स्वभाव आचार-विचार आणि एकूणच संपूर्ण व्यक्ती कळून येते. आमची वाचकांना एक विनंती आहे कि आपण स्वतः आठवा की आपण कोणत्या नात्याला वेळ देत नाही आहोत, देऊ शकत नाही आहोत किंवा देणारच नाही आहोत! या महामारीचा काळात टाळेबंदी मुळे एकमेकांची प्रत्यक्ष भेट होणे सहज शक्य राहिलेलं नाहीये, पण यामुळे नाते तुटू न देणे हे आपलेच कर्तव्य असते. कारण नाती आयुष्यभराची, सुखादुखाची सोबती असतात.

जर दुरुवा आलाच असेल, चिडचिड आणि अबोला वाढतच असेल तर ते तुमच नातं तुमचा वेळ मागत आहे. अशा वेळी तुम्ही केवळ त्या तुमच्या नात्याला ५ मीनीट वेळ देऊन बघा. हा ठरवून केलेला संवाद ५ मिनिटे ओलांडून कधी एक तासाचा होऊन जाईल तुम्हालाच कळणार नाही.

चला तर मग या ओढावलेल्या दुराव्यामध्ये संवाद हे एकच माध्यम ठेऊन नाती जपण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करूयात.

धन्यवाद. 

 ©Team E Times Today

अशाच नवनवीन माहिती साठी, लेटेस्ट बातम्यांसाठी वाचत राहा

E Times Today



विचार मंथन , अनुभव , नातेसंबंध, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी लेख, मनातील हितगुज, मनातील गप्पा,  Article, blog,