तू दुःखहर्ता
सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषक ध्वजा
शुभद सुमंगल सर्वांआधी तुझी पाद्यपूजा
अशा गणरायाचे आपल्याकडे आगमन झाले आहे. वर्षभर ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहात असतो त्या लाडक्या बाप्पाची आज घरोघरी प्रतिष्ठापना झाली आहे. दरवर्षीचा गाजावाजा या वर्षी नसला तरी प्रत्येकाचा उत्साह मात्र तोच आहे. आज प्रत्येकजण या आधीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी काढत हा उत्सव आज साजरा करीत आहे.
गोकुळ अष्टमी झाली की सर्वांनाच वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे आणि तशी तयारीही आपापल्यापरीने प्रत्येक घरात सुरू होते. बाप्पाची मूर्ती निवडण्यापासून सुरुवात होते. आजही गावी आपापल्या गणपतीच्या मूर्तीसाठी गणपतीच्या मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांकडे(कुंभारवाड्यात) बाप्पासाठी पाट नेऊन द्यायची पद्धत आहे. आरास, मखर, सजावटीसाठी चर्चा होत राहतात. पाच सहा वर्षापूर्वीपर्यंत सर्रास थर्माकोलची मखरे घरोघरी बनवली जात असत. लहानशा मखरापासून एखाद्या मंदिराची प्रतिकृतीही तयार करीत असत. आता थर्माकोलवर बंदी असल्याने गेल्या चार-पाच वर्षांपासून पुठ्ठ्यांची मखरे बाजारात विक्रीस उपलब्ध होत आहेत. तसेच खर्या व कृत्रीम फुलापानांची मखरे, कमानी आणूनही आरास केली जाते. काही काही घरात तर घरच्या बाप्पासमोरही निसर्गाचा देखावा तर कधी सामाजिक संदेश देणारा देखावाही तयार करतात. बाप्पासाठी दागिन्यांची पद्धती आता फारच प्रचलित झाली आहे. पूर्वी एखादा मोत्यांचा हार बाप्पाला घातलेला असे पण आता चांदी सोन्याचे परसू, जास्वंद, मुकूट, कंठा, बाजूबंद, कमळ, अगदी मोदक, दूर्वासुद्धा खरेदी केले जातात आणि बाप्पाला परिधान केले जातात, हा झाले घरातील गणपतींचे. सार्वजनिक गणेशोत्सवांचे तर स्वरूपच वेगळे. काही काही गणेश मंडळे अतीश्रीमंत तिथे तर गणरायाचे वरील दागिने तर सोन्याचे असतातच शिवाय बाप्पाच्या सोंडेवर सोन्याचा अलंकार असतो, बाप्पाचे हात, कान, सुळा, पाऊलेसुद्धा सोन्याची आहेत. मखरेही सोन्यारूप्याची रत्नजडीत आहेत. अशा गणपतीच्या दर्शनालाही मोठी गर्दी उसळलेली दिसून येते. ढोल, ताशाच्या गजरात, लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजात मिरवणूकीने त्याचे आगमन मोठ्या थाटात होत असते.
यावर्षी मात्र या मिरवणूकींना बंदी आहे ती सोशल डिस्टंस्टींगमुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. सार्वजनिक गणेश मंडळे सात आठ दिवस आधीच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंडपात करीत असतात आणि नंतर त्याची सजावट केली जाते. त्यामुळे मंडळाच्या गणपतीच्या आगमनाच्या मिरवणूक आधीपासूनच सुरू असते. रोज एक दोन मिरवणूकी तरी दिसतच. आमच्या सोसायटीच्या मागच्या सोसायटीतच मूर्ती बनविण्याचा कारखाना असल्याने तिथून मूर्ती घेऊन जातात. ढोल, ताशांचा गजर सतत कानावर पडत असतो, मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह तर ओसंडून वाहात असतो, मूर्ती ट्रक, टेम्पोमध्ये ठेवतानाची त्यांची धडपड, मूर्तीला धक्का लागू नये सावधगिरी पाहण्यासारखी असते. हे सर्व चालू असताना सतत 'गणपती बाप्पा मोरया' हे सुरूच असते ही घोषणाच जणू प्रत्येकाला ऊर्जा देत असते. आदल्या दिवसापासून घरच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती नेण्यास वर्दळ सुरू असते. याततर अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच उत्साहात सामील असतात. मुली, तरूणी, स्त्रियाही सहभागी असतात. आमच्या इथे एक वेगळाच अनुभव येतो, जेव्हा बाप्पाची मूर्ती कारखान्यातून घरी नेण्यासाठी हातात घेतात तेव्हा तुतारी वाजविली जाते त्यासाठी एक तुतारी वादक तिथे खास गणेश चतुर्थीला असतो. फटाके, ढोल, ताशे, तुतारी, टाळांच्या गजरात गणपती आपापल्या घरी नेतात.
यावर्षीचा बाप्पाच्या आगमनाचा दिवस मात्र याबाबतीत फारच सुना गेला ना ढोल, ताशांचा आवाज ना टाळांचा गजर, ना तुतारीची तान कुठेतरी एखादा 'गणपती बाप्पा मोरया' असा आवाज येई, हे झाले घरच्या बाप्पाचे. सार्वजनिक बाप्पा यावर्षी बसवलेच नाहीत अगदीच कुठेतरी तुरळक. पण घरी आल्यावर मात्र बाप्पाचे नेहमीप्रमाणेच कोडकौतुक होत आहे. विकतच्या मिठाईपेक्षा बाप्पालाही यावेळी प्रत्येक घरात घरातील गृहिणीने निगुतीने केलेल्या पदार्थांचा नैवेद्य मिळत आहे. मोदक, खीर, लाडू अशा अनेक पदार्थांची घराघरांत रेलचेल सुरू आहे. बाप्पालाही यावर्षी २०-२५ वर्षापूर्वीचे दिवस आठवत असतील आणि तीही थोडा सुखावला असेल.
दरवर्षी गणेशोत्सव सुरू होण्याआधी पर्यावरणप्रेमींचे गणेश भक्तांना आवाहन असते की गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करा, एक गाव एक गणपती. परंतु याकडे नेहमीच उत्साहाच्या भरात दुर्लक्ष करीत हा उत्सव साजरा केला जात असतो. यावर्षी मात्र खरोखरच पूर्ण नसला तरी बर्याच जास्त प्रमाणात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे, हे या कोरोना महामारीमुळे आलेल्या निर्बंधांचा परिणाम आहे. २५-३०फूटांच्या मूर्ती दरवर्षी बनवल्या जात असत, त्या यावर्षी अगदी ४-५ फूटांवर आल्या आहेत तर यावर्षी बर्याच मंडळांनी गणेशोत्सवच साजरा न करण्याचे ठरविले आहे, आगमन आणि विसर्जनावेळीही मिरवणूकीला बंदी घातली असल्यामुळे वायु, आवाजाचे प्रदुषणही होणार नाही. विसर्जन घरच्या घरी करण्याचे आवाहन आणि सार्वजनिक गणपतींची उंची व मूर्तीही कमी असल्याने पाण्याचे प्रदूषणही कमी होईल, ही जरी एक जमेची बाजू असली तरी गणेशोत्सव थोडा उदासच वाटत आहे.
कोरोना महामारीमुळे कित्येक घरात आज दुःखाचे सावट आहे, काही घरातील सदस्य या महामारीत बळी पडली आहेत, महामारीमुळे तीन महिन्याच्या टाळेबंदीमुळे कोणाला पगार मिळत नाहीत, कोणाची नोकरी गेली आहे, व्यवसाय-उद्योगधंद्यात आर्थिक नुकसान तर कोणाचे व्यवसायच धोक्यात आले आहेत. एका भीतीच्या सावटाखाली गेले सहा महिने प्रत्येकजण आयुष्य जगत आहे. ह्या गणेशोत्सवात या विघ्नहर्त्या गजाननाच्या पायी शरण जाऊन एकच मागणे आहे, हे कोरोनाचे विघ्न लवकरात लवकर दूर करीत तुझ्या भक्तांचे दुःख हरण करीत सर्वांना सुखी ठेव...
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा